तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात पावसाने उसंत घेतली असून, तालुक्यातील शेतकर्यांनी भाताच्या लावणीसाठी लगबग सुरू केली आहे; तसेच याकामी कृषी अधिकारदेखील स्वत: शेतात उपस्थित राहून शेतकर्यांना भातलावणीबाबत मागदर्शन करत आहेत. गेले दोन आठवडे तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाने सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. भात खाचरे तुडुंब भरली होती. तर काही ठिकाणी भात रोपे पाण्यात बुडाली होती.
गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकर्यांची भात लावगडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने भात लावगडीचे काम जोमात सुरु असल्याचे चित्र दिसून आले. मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणि इतर सर्व अधिकारी, कर्मचारी गावोगावच्या शेतकर्यांशी भातपिकाच्या लागवडी संदर्भात संवाद साधत आहेत. सर्वत्र भात लागवडी सुरु झाल्यामुळे लावगडीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. काही शेतकरी आपल्या घरातील सदस्यांना घेऊन लावणीचे काम पार पडत आहेत.