डोर्लेवाडी; पुढारी वृत्तसेवा: निरा डावा कालव्याची ज्या ठिकाणी अधिक गळती असेल, जेथे खरोखरच गरज असेल अशाच ठिकाणी आणि शेतकर्यांची मागणी असेल तेथेच कालव्याचे अस्तरीकरण होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
डोर्लेवाडीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य राहूल झारगड, सरपंच बाळासाहेब सलवदे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, बारामती आणि परिसरामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र विरोधकांना विरोध करण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्याने या अस्तरीकरणाला विरोध केला जात आहे. भाजप सरकारच्या काळातच बंद जलवाहिनीमधून पाणी आणण्याचे नियोजन होते. ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी पाणी झिरपून मोठ्या प्रमाणात वाया जास्त आहे, त्या ठिकाणी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. कालव्याचे अस्तरीकरण होणार आहे, मात्र ज्या ठिकाणी गरज आहे आणि शेतकर्यांची मागणी असेल त्याच ठिकाणी अस्तरीकरण होईल. विरोधक मात्र यामध्ये स्पष्टपणे शेतकर्यांची दिशाभूल करीत आहेत. शेतकर्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
डोर्लेवाडी रस्ता दहा मीटरचाच
डोर्लेवाडी येथील रस्ता हा दहा मीटरचाच होणार आहे. परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. बीकेबीएन रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम गेली अनेक वर्षे डोर्लेवाडीत रखडले आहे. ग्रामस्थांची दहा मीटर रस्त्याची मागणी होती. यासंबंधी पवार यांनी आश्वस्त केले. अधिकार्यांशी चर्चा करून हा रस्ता दहा मीटरचा केला जाईल; मात्र नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे, असेदेखील अजित पवार यांनी सांगितले.