पुणे

डिजिटल युद्धात ‘भीम’ गारद; भीम अ‍ॅपचा पराभव झाल्याचे चित्र

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : ऑनलाईन व्यवहारासाठी वेगवेगळे अ‍ॅप वापरले जात आहेत. परंतु केंद्र सरकारने तयार केलेले भीम अ‍ॅप मात्र आजही लोकांच्या पसंतीस उतरले नाही. त्यामुळे ते थेट पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. भीम अ‍ॅप युजर फ्रेंडली करण्यात आणि त्याची अपेक्षित प्रसिद्धी करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळे डिजिटल युद्धात भीम अ‍ॅपचा पराभव झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2016 रोजी डिजिधन संमेलनात भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅप सादर केले. आधार कार्डावर आधारित हे  भीम अ‍ॅप इंटरनेटशिवाय वापरता येत आहे. हे अ‍ॅप यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) आणि यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हिस डेटा)चे नवे व्हर्जन आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा घेता येत आहेत. परंतु लोक याचा फारसा वापर करताना दिसून येत नाहीत.

भारतात दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांना पसंती मिळत आहे. मजुरांपासून ते आयटीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांपर्यंत सर्व लोक ऑनलाईन व्यवहार करत आहेत. ऑनलाईन व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2022 मध्ये ऑनलाईन व्यवहारांचा आकडा 1 हजार बिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऑनलाईन व्यवहारांचा सर्वाधिक वापर प्रवासादरम्यान करण्यात येत आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये सध्या गुगल पे या अ‍ॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसर्‍या स्थानावर 11.9 टक्क्यांसह फोन पे हे अ‍ॅप आहे. तिसर्‍या स्थानावर 9.7 टक्क्यांसह पेटीएम अ‍ॅप आहे. त्यानंतर 8.5 टक्क्यांसह व्हॉट्सअ‍ॅप आणि पाचव्या स्थानावर भीम अ‍ॅप आहे.

काय व्हाव्यात सुधारणा

भीम अ‍ॅप सुधारण्यासाठी काय बदल व्हावेत याविषयी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप युजर फ्रेंडली होणे गरजेचे आहे. यामध्ये सामान्यातील सामान्य माणसाला हे अ‍ॅप वापरता येणे गरजेचे आहे. अ‍ॅप वापरत असताना गेट वे मिळण्यात अडचणी आहेत. ही अडचण सोडविणे गरजेचे आहे. अ‍ॅप वापरत असताना विविध कॅशबॅक सुविधा देणे गरजेचे आहे. अ‍ॅप लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्याची अपेक्षित प्रसिद्धी होणे गरजेच आहे. या सर्व सुधारणा केल्या तर जास्तीत जास्त लोक हे अ‍ॅप वापरतील.

कोणते अ‍ॅप वापरायचे हे लोक ठरवतात. त्यासंदर्भात लोकांवर कोणतेही बंधन घालता येत नाही. सध्या ऑनलाईन व्यवहारांसाठी लोकांकडे विविध अ‍ॅप आहेत. ङ्गभीमम अ‍ॅप वापरासंदर्भात मार्केटिंग होणे गरजेचे आहे. फोन पे किंवा गुगल पे लोकांच्या पसंतीस उतरले त्यासाठी जी पद्धत वापरली गेली ती भीम अ‍ॅपसाठी वापरणे आवश्यक आहे. अ‍ॅपमध्ये कोणतीही त्रुटी नाही. परंतु ते लोकांपर्यंत पोहचले नाही हे वास्तव आहे.

                                   – डॉ. दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ

भीम अ‍ॅपचा वापर सर्वांनी करणे गरजेचे आहे. खासगी अ‍ॅपचा वापर केल्यामुळे गोपनीय माहितीची चोरी होण्याची शक्यता आहे. ते टाळता येईल. ऑनलाईन व्यवहारांमध्ये काही टक्के रक्कम खासगी कंपन्यांना द्यावी लागते. ती रक्कम भारतातच राहील. तसेच सरकार तिजोरीत खडखडाट व्हायला लागल्यावर जे कर नागरिकांवर लादते त्यातून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

                                   – डॉ. प्रीतम वंजारी, आयटी तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT