मंचर : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू सागर) गुरुवारी (दि. 11) शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणाच्या पाच सांडव्यावरून घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषतः पाटण, आहुपे खोर्यात होत असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली.
28 जुलै रोजी धरणात 60 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. विशेषत: गेल्या चार दिवसांत सुमारे 40 टक्के धरण साठा वाढला आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याची माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आणि शाखा अभियंता दत्ता कोकणे यांनी दिली.
डिंभे धरण भरल्याने सांडव्यावरून घोड नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीलाही पूर आला आहे. नदीकाठच्या शेतकर्यांनी शेतीपंप काढण्यासाठी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरण लवकर भरल्याचे अभियंता तानाजी चिखले यांनी सांगितले. धरण भरल्यामुळे शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.