पुणे

डासांच्या चार प्रजातींमुळे पाच आजार; प्रतिबंध हाच प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : जोरदार पाऊस, जागोजागी साठणारे पाणी आणि त्यात होणारी डासांची पैदास यामुळे हिवताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग अशा आजारांना आमंत्रण मिळते. कोरोनामुळे नागरिकांचे घराबाहेर जाण्याचे कमी झालेले प्रमाण आणि स्वच्छतेबाबत सतर्कता, यामुळे डासांमुळे होणार्‍या आजारांत घट झाली होती. 'यावर्षी राज्यात हिवतापाचे 9933, डेंगीचे 2290, तर चिकनगुनियाचे 549 रुग्ण आढळून आले आहेत,' अशी माहिती राज्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली. 20 ऑगस्ट 1897 रोजी डॉ. रोनाल्ड रॉस यांनी कोलकात्यामध्ये हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला.

त्यामुळे दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी 'जागतिक डास दिन' पाळला जातो. जगामध्ये डासांच्या जवळ जवळ 3500 प्रजाती आहेत. या प्रजाती साधारणत: अनोफेलिस, क्युलेक्स, एडीस व मंसोनिया चार जमातींमध्ये विभागलेल्या आहेत. या चार प्रजाती वेगवेगळ्या आजारांचा प्रसार करतात. अनोफेलिस डासापासून हिवतापाचा प्रसार होतो, कुलेक्स डासापासून हत्तीरोग व जपानी मेंदुज्वर या आजाराचा प्रसार होतो. एडिस डासापासून झिका, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचा प्रसार होतो. मंसोनिया डासापासून हत्तीरोग होतो.

डासांच्या प्रादुर्भावाचा बंदोबस्त करणे हा आजारांचे संक्रमण रोखण्याचा एकमेव उपाय आहे. डासांना प्रतिबंध करण्यापूर्वी डासांचे जीवनचक्र समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक डास हा दर तीन दिवसांनी 150-200 अंडी घालत असतो. या अंड्यातून एक ते दोन दिवसांत अळी तयार होते. या अळीच्या चार अवस्था झाल्यानंतर त्याचा कोष तयार होतो व या कोषातून संपूर्ण डास साधारणतः 8-12 दिवसांमध्ये तयार होत असतो. अंडी, अळी, कोष यांची वाढ पाण्यात होत असते. त्यामुळे ही वाढ पाण्यातच रोखणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एकदा प्रौढ डास तयार झाल्यानंतर त्याला पकडणे किंवा त्याला मारण्यासाठी महागडी कीटकनाशके वापरावी लागतात, असे डॉ. जगताप यांनी सांगितले.

या आहेत उपाययोजना
1. घरातील, परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करावेत.
2. साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून ठेवावीत.
3. जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत, अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा.
4. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्यात यावा.
5. वेंट पाइपला जाळ्या बसवाव्यात.
6. निरुपयोगी टायरचे संकलन करून नायनाट केल्यास रुग्णसंख्येत 25 टक्के घट शक्य.
7. गटारे वाहती करावीत.
8. घराच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
9. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
10. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे.

ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. तो ताप कोणत्याही परिस्थितीत जास्त दिवस अंगावर काढू नये. आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहे. पाणी काही लोकांसाठी जीवन आहे, तर तेच पाणी काहींचा जीवही घेऊ शकते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.

                                                              – डॉ. महेंद्र जगताप, कीटकशास्त्रज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT