पुणे

ठाकर समाजाच्या घरांसाठी 20 गुंठे जागा देणार; केंदूर ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश साकोरे यांची माहिती

अमृता चौगुले

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील केंदूर परिसरातील ठाकरवाडी येथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील रामा रावबा गावडे यांचे घर कोसळले. या पार्श्वभूमीवर आदिवासी कुटुंबांसाठी सुमारे वीस गुंठे जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, याबाबत निर्णय लवकरच ग्रामसभेत घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे यांनी दिली. केंदूर येथील ठाकरवाडी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील रामा रावबा गावडे यांचे घर कोसळले. दुर्दैवाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये हेच घर कोसळून एका छोट्या मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच, मुलाची आई व आजी जखमी झाल्या होत्या. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा बाका प्रसंग उद्भवला होता.

खेड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला; परंतु शिरूर तालुक्यात मोडणारा आदिवासी ठाकर समाज शासकीय सुविधांपासून वंचित आहे. या ठिकाणी सुमारे 25 आदिवासी कुटुंबीय राहत असून, मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून या आदिवासी कुटुंबांसाठी गावकीची सुमारे वीस गुंठे जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत मासिक सभेत अथवा ग्रामसभेमध्ये निर्णय घेणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी दिली. तसेच, आदिवासी समाजासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच वर्षांनंतरही नुकसानभरपाई नाही
केंदूरमध्ये सुमारे दोन हजार लोकसंख्या आदिवासी ठाकर समाजाची आहे. पाच वर्षांपूर्वी गावडे कुटुंबाला नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने पंचनामा करून कार्यवाही देखील केली होती. परंतु, अद्यापही या कुटुंबाला मदत मिळू शकलेली नाही. शासकीय नियमांच्या अडथळ्याचा फटका या आदिवासी ठाकर समाजाला बसत आहे.

SCROLL FOR NEXT