पुणे; पुढारी वृत्तसेवा: ट्रॅक्टर आता 'सीबीजी' इंधनावरही चालवता येईल असे संशोधन पुणे शहरातील 'प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड' या जगप्रसिध्द कंपनीने यशस्वीपणे करुन दाखवले आहे.त्यावर पथदर्शी प्रकल्प नुकताच तयार केला असून त्याचे उदघाटन केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे.त्यामुळे ट्रॅक्टर आता डिझेलसह सीबीजी या इंधनावर चालवता येणार आहे. प्राज इंडस्ट्रीज लि.या कंपनीने केलेल्या या संशोधनामुळे चक्राकार जैवअर्थव्यवस्थेच्या टाकण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
साखर कारखान्यातील स्पेंटवाशपासून दररोज दहा टन संपीडित जैववायू (काम्प्रेस्ड बायोगॅस, सीबीजी)ची निर्मिती करू शकणारा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हसोबा साखर कारखान्यात प्राज कंपनीने केला आहे. यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर आता डिझेलसह सीबीजीवर चालवता येतील. या संशोधनामुळे वातावरणातील घातक हरितवायूचे उत्सर्जन आता रोखता येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
असा होणार संशोधनाचा फायदा
साखर कारखान्यासाठी दररोज सुमारे 350 ते 400 ट्रॅक्टर ऊस वाहतूक करतात. त्यांपैकी 75 टक्के ट्रॅक्टरला डिझेल आणि सीबीजी अशा दुहेरी इंधनांवर धावू शकतील. त्यासाठी ड्युएल फ्युएल किट बसविण्यात आली. त्यामुळे दर हंगामात अडीच ते तीन कोटी रुपयांची इंधनखर्चाची बचत होईल. असा हा पथदर्शी प्रकल्प प्राज कंपनीने श्रीनाथ म्हसोबा साखर कारखान्याला तयार करून दिला आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रॅक्टरमधून निघणारा हरितगृहवायू उत्सर्ग 65 टक्क्यांनी कमी होणार आहे. एकूण सीबीजी निर्मिती व वापरातून रोज 30 टन कर्बोत्सर्ग कमी होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.तसेच सीबीजीची निर्मिती स्पेंट वॉशप्रमाणेच टाकाऊ शेतमाल, जनावरांचे शेण, मळी, सांडपाणी, घनकचरा, औद्योगिक कचर्यातील जैवविघटनकारी घटक अशा अनेक स्रोतांपासून केली जाऊ शकते.
अतिरिक्त साखरेचाही प्रश्न सुटणार..
अतिरिक्त साखरेचा प्रश्न दरवर्षी आ वासून उभा राहात असताना आणि साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारावर त्याचा परिणाम होत आहे. मद्यार्कासारख्या उपपदार्थ निर्मिती प्रक्रियेतील स्पेंट वॉशसारख्या टाकाऊ घटकापासून सीबीजीची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. कारखान्यासह शेतकरी, बेरोजगार तरुणांनाही या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते.
अर्थव्यवस्थेला चालना..
प्राज इंडस्ट्रीज लि. या कंपनीने केलेल्या या संशोधनामुळे चक्राकार जैवअर्थव्यवस्थेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात कंपनीने मोठी भूमिका बजावली आहे. सीबीजीची निर्मिती स्पेंट वॉशप्रमाणेच टाकाऊ शेतमाल, जनावरांचे शेण, मळी, सांडपाणी, घनकचरा, औद्योगिक कचर्यातील जैवविघटनकारी घटक अशा अनेक स्रोतांपासून केली जाऊ शकते.
स्पेंट वॉशपासून सीबीजी निर्मिती आणि त्याच सीबीजीचा आपल्या कारखान्याला ऊस घालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी इंधन म्हणून वापर करण्याचे स्वागतार्ह पाऊल श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने टाकले आहे. एकीकडे जागतिक तापमानवाढीचे संकट जगापुढे उभे राहिले आहे. शाश्वत अशी जैवअर्थव्यवस्था आकाराला येणे हे त्यावरील उत्तर आहे. दुसरीकडे, त्यासाठीचे प्रयत्न ही सरकारची जबाबदारी आहे असे कानावर हात न ठेवता, ग्रामीण भागातील एक कारखाना त्यावर विकेंद्रित उपाययोजनेचा मार्ग दाखवत आहे. त्याचे अनुकरण ही आजची गरज आहे.
– डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लि.