पुणे : पुढारी वृत्तसेवा: दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या टोळक्याला बसण्यासाठी खुर्ची न दिल्याच्या कारणातून हॉटेलची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. टोळक्याने एकावर शस्त्राने वार केले तसेच परिसरातील हॉटेल, बिअरबार आणि एका दुकानावर दगडफेक करून दहशत माजवली. याप्रकरणी सराइत गुंड रूपेश घोरे, शुभम नाईक, अंक्या भोसले, अर्जुन ऊर्फ भावड्या जगताप, गणेश इंगळे, सोमा यांच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण मसय्या बंगारी (वय 23, रा. सिद्धार्थनगर, बिबवेवाडी) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टोळक्याने केलेल्या मारहाणीत बंगारी, त्याचे मित्र राहुल खरात, मयूर भडाव्वे, गौस शेख जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घोरे सराईत गुंड आहे. तो आणि त्याचे साथीदार कात्रज-कोंढवा रस्त्यावरील 'सरपंच' हॉटेलमध्ये रात्री आले होते. त्या वेळी बंगारी, खरात, भडाव्वे चहा पित होते. आरोपी घोरेने बसण्यास खुर्ची देण्यास बंगारीला सांगितले. बंगारीने नकार दिल्यानंतर घोरे आणि साथीदार चिडले. त्यांनी आरडाओरडा करून दहशत माजविली.
त्यानंतर बंगारी, खरात, भडाव्वे, शेख यांना शिवीगाळ केली. टोळक्याने कोयत्याने शेख याच्यावर वार केला. बंगारीला दांडक्याने मारहाण करून त्याच्या हातावर वार केला. खरात आणि भडाव्वे यांना मारहाण करून दुचाकीची तोडफोड केली. 'सरपंच' हॉटेल, 'एअरकिंग' परमिट रूम तसेच एका दुकानावर दगडफेक करून दहशत माजवली. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
हेही वाचा