पुणे

‘टेरेस बार’ रडारवर!; ‘उत्पादन शुल्क’चा निर्णय

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मद्यपींना खुल्या आकाशाखाली टेरेस बारमध्ये बसून मद्याचा आस्वाद घेणे दुरापास्त होणार आहे. कारण उत्पादन शुल्क विभागाने उद्यापासून (दि.30) शहरातील टेरेस बारवर कारवाईची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बारा पथके तैनात करण्यात आली असून, कारवाईत विसंगती आढळल्यास अधिकार्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून रूजू झालेले चरणसिंग राजपूत यांनी शहरातील बार चालकांची झाडाझडती सुरू केली आहे.

अधीक्षकांनी बुधवारी (दि.29) एक नोटीस काढून टेरेसवर अनधिकृतरीत्या मद्य वितरण करणार्‍या बार चालकांवर कारवाईचे हत्यार उपसले आहे. टेरेस बारमध्ये येणारे ग्राहक उच्चभ्रू असले तरी मद्यसेवनानंतर झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होते. या घटनेचे पडसाद नंतर शहरभर उमटतात, अशा आशयाच्या तक्रारी संबंधित विभागाकडे आल्या होत्या.

बारा पथके आजपासून फिरतीवर
शहरात नगर रोड, कोरेगाव पार्क, खराडी बायपास, कल्याणीनगर, विमाननगर, कात्रज रोड, जंगली महाराज, दांडेकर पूल, मगरपट्टा, सिंहगड रोड, एरंडवणा, एफ.सी.रोड, सेनापती बापट रोड, कोथरूड, सहकारनगर, शहराचा मध्यवर्ती भाग, पुणे रेल्वे स्टेशन यांसह आयटी पार्क परिसरात मोठ्या हॉटेलमध्ये टेरेस बार अनधिकृतपणे चालवले जात आहेत. या बारचालकांकडून नियमानुसार रात्री अकरा वाजल्यानंतर समोरचे शटर बंद दाखवून टेरेस बार खुलेआम सुरू असतो.

यासाठी टेरेसवर मद्यसाठा करून त्याचे वितरण ग्राहकांना केले जाते. शहरातील अनेक अपार्टमेंटखाली दुकाने असून, त्यात बेकायदा बार चालविले जात आहेत. रात्रीच्या वेळेस दुकानाबाहेर असलेल्या खुल्या जागेत (ओपन टेरेस) ग्राहकांना सेवा दिली जाते. प्रत्यक्षात असे टेबल बाहेर लावणे नियमबाह्य आहे. हे सर्व टाळण्यासाठी अधीक्षकांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना नोटीस जारी करत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बार चालकांच्या संघटनेत कुजबूज
शहरात चालणारे अनेक बार इमारतीच्या समोरील खुल्या जागेत, काही बार इमारतीच्या अंडरग्राऊंड असलेला पार्किंगच्या जागेवर, तर काही बार गच्चीवर टेबल लावून चालविले जातात. उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा निर्णय घेतल्याने मोठ्या टेरेसबारच्या चालकांसह छोट्यावरही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे आर्थिक भुर्दंड सोसण्याच्या भीतीपायी अनेकांनी संघटनेचा आधार घेण्याची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे गच्चीवर चालणार्‍या बेकायदा हॉटेल, बार चालकांना तिप्पट मिळकतकर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या दोन्ही कारवाईमुळे बार चालकांमध्ये गोंधळ होऊन अनेकांनी धंदाच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

टेरेस बारवर मद्यसाठा करून त्याचे वितरण केले जाते. परवानगी एकाची घेतली जाते अन् व्यावसायिकदृष्ट्या खुल्या जागेत बार चालविण्याचे उद्योग केले जातात. हे रोखण्यासाठी आजपासून आमच्या विभागाकडून नेमण्यात आलेली पथके शहरभर फिरून कारवाई करणार आहेत.

                        -चरणसिंग राजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT