पुणे

जुन्नरला शेतकर्‍यांना आर्थिक साक्षरतेचे धडे; जिल्हा बँकेचे तालुक्यात 30 मेळावे

अमृता चौगुले

जुन्नर, पुढारी वृतसेवा: तालुक्यातील शेतकर्‍यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात येत असून येत्या सप्टेंबरअखेर तालुक्यात 30 मेळावे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. संजय काळे यांनी दिली.
बँकेचे अधिकारी, विकास अधिकारी व कर्मचारी यांना या योजनेबाबत माहिती देताना आयोजित बैठकीत ते बोलत होते. नाबार्डच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरू असून या मेळाव्यांमध्ये तत्काळ खाते उघडून देणे, मोबाईल व इंटरनेट बँकिंगबाबतची माहिती देणे, बचतीचे फायदे, अपघाती विमा, बचतगट कर्ज आदींबाबत माहिती व मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाषराव कवडे यांनी दिली.

दरम्यान या मोहिमेतील वडज (ता. जुन्नर) येथील मेळाव्याला जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, सोनाली गाडे पाटील, सारिका पारेख, स्वाती वाव्हळ, कुंदा सराईकर, राजेंद्र चव्हाण, सरपंच सुनील चव्हाण व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकर्‍यांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील उदापूर, नारायणगाव, कांदळी, राजुरी, बोरी बु., जुन्नर, सावरगाव, अलदरे, ओतूर, धामणखेल, बेल्हे, मंगरूळ, पारगाव तर्फे मढ, वडगाव आनंद, माणकेश्वर, पिंपळवंडी, चिंचोली, खोडद, उंब्रज, डिंगोरे, आळे, तांबे, ओझर, अणे आदी गावांमध्ये मेळावे आयोजित करण्यात येणार असून शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विकास अधिकारी संजीव गोसावी यांनी यावेळी केले.

SCROLL FOR NEXT