पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी (दि. 23) पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रीपासून बारामती, इंदापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. आता खेड, वेल्हे, शिरूरचा बेट भाग आदी परिसरातदेखील दमदार पाऊस पडला. या पावसाने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पेरणीच्या कामाला वेग येणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. चाकण (ता. खेड) परिसरात बुधवारी (दि.22) रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (दि.23) दुपारी बारापर्यंत अधूनमधून पावसाच्या मध्यम ते दमदार सरी पडत होत्या. चाकणलगतच्या भागात पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनी गती घेतली आहे. शेतकर्यांनी मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाचे स्वागत केले आहे.
मागील तीन आठवडे लपंडाव खेळलेल्या पावसाने आता चाकण परिसरात सर्वत्र दमदार हजेरी लावली. पावसाअभावी सर्वत्र मरगळ आल्याचे वातावरण होते. परंतु पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी बांधव आणि नागरिक सुखावले आहेत. वीज वितरणचा नेहमीप्रमाणे बोजवारा उडाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.
दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर पुन्हा कडकडीत ऊन पडले. पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नाशिक महामार्गावर चाकण शहरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, उड्डाणपुलाच्या लगतचा परिसर आणि शहरातील इतर सखल भागातही पाणी तुंबले आहे. त्यामुळे या भागातून मार्गक्रमण करताना पादचारी आणि दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.
हेही वाचा