पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिखली जलशुद्धीकरण केंद्र ते देहू-आळंदी रस्त्यावरील सोनवणे वस्तीपासून स्पाइन रस्त्यापर्यंत 1,100 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी चिखलीतील रस्ते 5 ऑगस्टपर्यंत महिनाभर बंद राहणार आहेत. नागरिक व वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सोमवारी (दि.4) केले आहे.
आंद्रा धरण पाणी योजनेत निघोजे येथील इंद्रायणी नदीतून 100 एमएलडी अशुद्ध पाणी उपसून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यात येणार आहे. पिंगळे रस्त्यावरील राधास्वामी सत्संग न्यास ते चिखली-आकुर्डी रस्ता, रॉयल ग्रॅनाईड ते नेवाळे वस्ती कॉर्नर ते गणेश मंदिर नेवाळे मळा ते विनायक रेसिडेन्सी, व्हिक्टोरिया स्कूलसमोरील रस्ता ते साई प्रयाग सोसायटी ते घरकूल भाजी मंडई रस्ता ते साई सदन सोसायटीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.