पुणे

जमीन मूल्यांकनाचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे

अमृता चौगुले

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरासाठी प्रस्तावित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी जिल्ह्यातील 43 गावांपैकी पूर्व भागाच्या हवेली तालुक्यातील 15 गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविला आहे, अशी माहिती हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले यांनी दिली. पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. एकूण 43 गावांतून हा रिंगरोड जातो. यासाठीच्या मार्गिका निश्चित करण्यासाठी उशीर झाल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिंगरोडच्या मार्गिकेच्या मोजणीचे काम सुरू झाले.

हवेली तालुक्यातील 15 गावातून हा रिंगरोड जात असून येथील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या जमिनीचे मूल्य निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवण्यात आल्याचे आसवले यांनी सांगितले. राज्य सरकारने भूसंपादनासाठी निश्चित केलेल्या 1434 कोटींपैकी 33 टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे. जमिनीचे मूल्यांकन रेडीरेकनर आणि संबंधित क्षेत्रातील गेल्या तीन वर्षाच्या व्यवहारांचा विचार करून केले जात आहे.

गावकर्‍यांशी चर्चा करून जमिनीचे दर निश्चित करण्यात येत असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकार्‍याने सांगितले. मूल्यांकनाचे काम ऑगस्टअखेर संपेल असेही ते म्हणाले. भूसंपादन केल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी या जमिनी एमएसआरडीसीच्या नावावर हस्तांतरित केल्या जातील. प्रस्तावित रिंगरोड पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा असेल. हा मार्ग सहा पदरी असून त्यात सात बोगदे, सात अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओव्हर बि—ज असणार आहेत.

SCROLL FOR NEXT