पुणे

जबरी चोरी करणारे चोरटे शहरात सुसाट! तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जबरी चोरीचे सत्र सुरूच असून रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांना गाठून हत्याराचा धाक दाखवून लुटले जात आहे. धक्कादायक म्हणजे, मोबाईल, गाडी आणि रोकड चोरून नेताना जिवे मारण्याचा प्रयत्न या लुटारूंकडून होत आहे. अशा प्रकारचे शहरात तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यातील एक प्रकार मोबाईल चोरी, दुसरा दुचाकी चोरी आणि तिसरा सोनसाखळी चोरीचा प्रकार आहे. पहिल्या घटनेत देव वर्मा (23 रा. धायरकर वस्ती, मुंढवा, पुणे) हे 25 जुलै रोजी कल्याणीनगर येथील क्लोवर वॉटर गार्डन सोसायटी येथून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सायकलवरून मोबाईलवर बोलत जात होते.

त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातातील मोबाईल चोरून नेला. याबाबत वर्मा यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसर्‍या घटनेत आकाश गुप्ता हे 24 जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास साळुंखे विहार ते गंगाधाम रोडने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांना गंगाधाम चौकापर्यंत लिफ्ट मागितली. गुप्ता यांनीदेखील त्यांना माणुसकी दाखवत त्यांना गाडीवर बसवले, तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ते आईमाता मंदिरासमोर सोडायला गेले. त्यावेळी फिर्यादी यांना थांबवून त्यांच्या ताब्यातील दुचाकी जबरदस्तीने काढून घेत धूम ठोकली.

याप्रकरणात दुचाकी चोरणार्‍या रोहित रामप्रताप वर्मा (22, रा. गणेशनगर, वानवडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत गुप्ता यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिसर्‍या घटनेत राकेश कपूर (49, रा. महंमदवाडी, कोंढवा) हे गुरुवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास महंमदवाडी येथील गॅ्ड्युअर डायनामिक नावाच्या नवीन बांधकाम साईटच्या बाजूला शतपावली करत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी कपूर यांची 70 हजारांची सोनसाखळी चोरून नेली. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT