इंदापूर : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसापूर्वी इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात पतंगाच्या मांजामुळे पावणे तीन वर्षाचा चिमुकला मरणाच्या दारातून परत आला. ही घटना ताजी असतानाचं इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं.2 येथील संतोष अर्जुन भोई हे या मांजाचे शिकार होता होता थोडक्यात बचावले.
रविवारी (दि. 7)भोई हे इंदापूर अकलूज मार्गे रुग्णालयात निघाले होते. याच दरम्यान या मार्गावरील कचरा डेपोच्या समोर त्यांच्या तोंडावरुन अचानक गळ्याला काहीतरी ओरबडतेय हे पाहून त्यांनी तात्काळ दुचाकी थांबवली. वेळीच थांबल्याने मांजा त्यांच्या गळ्याला काचला गेला. जरी खोलवर जखम नसली तरी दुचाकीला जर वेग असता तर मांजाने नक्कीच गळा कापला असता असे भोई यांनी सांगितले.
चिनी मांजा वापरायला बंदी असतानाही तो अगदी सहज मिळतो कसा? असा सवाल नागरिक विचारत आहेत.