पुणे

चिंकारा संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

अमृता चौगुले

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: बारामती चिंकारासाठी प्रसिद्ध असून, शेकडो हेक्टर वनक्षेत्र राखीव आहे. मात्र चिंकारासाठी आवश्यक असलेला अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे 'कार्य हीच ओळख' फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील चार तरुणांनी गावकर्‍यांच्या माध्यमातून चिंकारा संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. चिंकारा संवर्धनासाठी आवश्यक खुरटी बाभूळ, बोरी आणि चारा यांची ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून लागवड केली आहे. चिंकारा संवर्धनासाठी गावकरी या युवकांना मदतीचा हात देत आहे. नागरीकरण होत असताना गायरान पर्यावरणीय चळवळींचा इतिहास निर्माण करतील, अशी आशा बारामती तालुक्यात सत्यता आली आहे.

बारामती तालुका हा चिंकारा हरिण जातीसाठी प्रसिद्ध आहे. शासनाने मयुरेश्वर अभयारण्य 1300 हेक्टर चिंकारासाठी राखीव आहे. मात्र, तरीही बारामतीत वर्षाला एका तरी चिंकाराची शिकार होते, परिणामी चिंकारांचा अधिवास असुरक्षित झाला आहे. संबंधित विभागाचे जबाबदार असणारे अधिकारी कानावर हात ठेवून पाहण्याची भूमिका घेत आहे. वनक्षेत्रातून जाणारे नवीन रस्ते, वनक्षेत्रालगत सुरू असणार्‍या दगडखाणी यांच्यामुळे चिंकारांचा अधिवास बदलत आहे. चार वर्षांपासून शेतकरी व चिंकारांचा संघर्ष रोखण्यासाठी बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथील चार युवकांनी पुढाकार घेतला आहे.

ग्रामपंचायतीने कार्य हीच ओळख फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणार्‍या युवकांना साथ देत गावातील सहा हेक्टर गायरान पर्यावरण संवर्धनासाठी दिले आहे. फाउंडेशनने स्थानिक वन्य प्रजातींचा अभ्यास करून तिहेरी उद्देश ठेऊन दोन वर्षांपूर्वी नवीन आराखडा बनविला. आराखड्यात चराईबंदी व पिण्याच्या पाण्याची सोय केली, तर चिंकारा केंद्रस्थानी ठेवला आहे. चिंकाराचा अधिवास निर्माण करण्यात गावकर्‍यांना यश आले आहे. हरणांना ज्वारी, बाजरी ही पिके जास्त प्रमाणात आवडतात, मात्र वनविभाग वन जमिनीवर ही पिके खास हरणासाठी घेत नाही ती आम्ही घेणार असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले.

तिहेरी उद्देशात लागवड केलेली वृक्ष
आंबा, जांभूळ, वड, उंबर, करंज, बहावा, बाभूळ, खैर, बोर, कडुलिंब, पिंपळ, पिंपरण, वड, कांचन, सोनचाफा, कदंब, बकुळ अशी इतर 84 प्रकारची 1400 देशी झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. ग्रामपंचायतीने अधिक गायरानात वृक्ष लागवडीस परवानगी दिली तर हरित बन, चिंच बन, झाडांचे शतक, ऑक्सिजन पार्क, घन वन, पक्षांची पंगत, मोठ्या प्रमाणात साकारणार असल्याचे सौरभ बनकर यांनी सांगितले आहे.

चिंकाराचा अधिवास आढळणारी गावे
मुर्टी, मुढाळे, ढाकाळे, लोणीभापकर, सायंबाचीवाडी, देऊळगाव रसाळ, सुपे, जळगाव सुपे, कारखेल, उंडवडी, गोजुबावी, शिर्सुफळ, सावळ, रुई, कन्हेरी, सोनवडी सुपे, कारखेल या गावांनी चिंकारा संवर्धनासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने सक्ती केल्याशिवाय होणार नाही, अन्यथा सर्व गायराने स्थानिक पुढारी ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर महसूल अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

गावालगत असणार्‍या चिंकारांची भटकंती थांबविणे, त्यांचा नवीन अधिवास निर्माण करणे; तसेच स्थानिक जैवविविधता सुरक्षित करणे हाच आमच्या फाउंडेशनचा उद्देश आहे. माझे तीन मित्र आणि गावकरी यासाठी खास प्रयत्न करत आहेत.

                                              – समीर बनकर, कार्य हीच ओळख फाउंडेशन

वनक्षेत्रालगत शेतजमिनी ह्या धनदांडगे विकत घेऊन त्यावर कुंपण घालून बंदिस्त करून घेतात. त्यामुळे वनक्षेत्राबाहेर चिंकारा आल्यास तो कुंपनाचा शिकार होतो. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 ची वनसंरक्षणाकरिता काटेरी कुंपणाचा वेढा रोखणे गरजेचे आहे.
                                                                              – सागर जाधव,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT