कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात संततधारेने खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेले चासकमान धरण 75.36 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता धरणाच्या डावा कालव्याद्वारे 300 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने 1 जूनपासून 241 मिलिमीटर, तर मागील 24 तासांत 12 मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, चासकमान धरणात सुमारे 4 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
जलसाठ्यात येणार्या कमी-जास्त विसर्गानुसार खबरदारी म्हणून अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे सोडणे शक्य झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार वाढल्यास केव्हाही धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात प्रवाह सोडण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन हा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीपात्रात काही साधन साहित्य अथवा गोठ्यातील जनावरे असल्यास हलवावीत. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.