पुणे

चासकमान धरण 75 टक्क्यांवर; नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अमृता चौगुले

राजगुरूनगर/कडूस; पुढारी वृत्तसेवा: भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडत असून, यामुळे येणार्‍या पाण्यामुळे चासकमान धरण 74.43 टक्के भरले आहे. दरम्यान खरीप हंगामासाठी गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजेपासून धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 300 क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीकाठावर असलेल्या गाव, वस्त्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. चासकमान धरण जलाशय पातळी गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी 5 वाजता 646.270 मीटर झाली.

हा जलसाठा 186.85 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 74.43 टक्के झाला आहे. गुरुवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान भीमाशंकर अभयारण्य परिसरात 105 मिलिमीटर व चासकमान धरण भिंतस्थळी 30 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. जलसाठ्यात येणार्‍या कमी-जास्त विसर्गानुसार अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे सोडणे सुरू झाले आहे. तसेच नदीतूनही प्रवाह सोडण्यात येणार आहे. त्या पाण्याचा अंदाज करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात काही साधन, साहित्य अथवा गोठे, गोठ्यातील जनावरे असल्यास तत्काळ हलवावीत. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

SCROLL FOR NEXT