सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यात पश्चिम भागातील चांबळी, बोपगाव, भिवरी, गराडे, कोडीत परिसरात गेली पंधरा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पुरंदरमधील प्रसिद्ध वाटाणा पिकाचे खूप मोठे नुकसान झाल्याने महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी चांबळीचे शेतकरी भाऊसाहेब कामठे यांनी केली आहे पुरंदर तालुक्यातील खरीप हंगामातील वाटाणा हे प्रमुख पीक आहे पुरंदरच्या पश्चिम भागात एम. पी. थ्री व गोल्डन जातीचा वाटाणा घेतला जातो.
या हंगामामधील दोन महिन्यात खूप मोठी उलाढाल होत असते, परंतु गेली काही दिवस सतत पडणार्या पावसामुळे वाटाणा पीक अडचणीत आले आहे. वाटाणा पीक केवळ दीड ते दोन महिन्यात चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. यावर्षी पंधरा दिवस उशीर झालेला पाऊस व यानंतर झालेल्या संततदार पावसाने वाटाणा पिकाला बुरशी होऊन ते कुजले आहे. 2 एकर वाटाणा पिकासाठी अंदाजे 40 हजार रुपये खर्च आला आहे. खूप मोठे नुकसान झाले, त्यामुळे शासनाने पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चांबळी येथील शेतकरी प्रकाश कामठे यांनी केली आहे.
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम परिसरात सतत पडणार्या पावसामळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. वाटाणा पीक यंदा उशिरा पेरल्याने पावसामुळे नुकसान झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे पंचनामे करण्याची सध्या तरी गरज नाही. दोन दिवसांत पिकांची पाहणी करून नुकसान झाल्याचे समोर आल्यास पंचनामे व नुकसान भरपाईचा विचार करण्यात येईल.
-सूरज जाधव, पुरंदर तालुका कृषी अधिकारी