पुणे

चर्‍होली, धानोरे, मरकळ नदीपात्रात विसर्जन नको; आडवाटेने जात भाविक नदीतच करताहेत विसर्जन

अमृता चौगुले

श्रीकांत बोरावके

आळंदी : शहरात इंद्रायणी नदीघाटावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालत प्रशासनाने प्रदूषण मुक्तीला हातभार लावला आहे. असे असले तरी या बंदीमुळे इतर ठिकाणचे नदीपात्र भाविकांनी फुलून जात आहे. थोडक्यात आळंदीत विसर्जन करता येत नाही, म्हणून भाविक इंद्रायणी नदीच्याच इतर गावावरील नदीकाठाचा आधार घेत विसर्जन करत आहेत. एक ठिकाणी होणारे विसर्जन यामुळे इंद्रायणी नदीच्या पात्रात विविध ठिकाणी होत आहे. यामुळे प्रदूषण मुक्तीचा प्रश्न सुटतोय की विभागला जातोय हाही प्रश्नच आहे.

आळंदी पालिकेप्रमाणेच ग्रामपंचायत आणि महानगरपालिका हद्दीत येणारे इंद्रायणीचा काठदेखील सील किंवा बंदोबस्त लावून विसर्जनास प्रतिबंधित केले जावेत. आळंदीच्या घाटावरील बंदीच्या निर्णयाच्या धर्तीवर हा निर्णय केला जाणे गरजेचे आहे अन्यथा आळंदीतील निर्णयदेखील व्यर्थ जाईल असेल मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. स्थानिक ग्रामपंचायत हद्दीतील भाविक नदीत विसर्जन करताना अधिक दिसत नाहीत; मात्र बाहेरून याठिकाणी येणारे भाविक अधिक दिसतात. श्रद्धेचा मुद्दा असल्याने पोलिसांना देखील भाविकांना अडविताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी तर भाविक जीव धोक्यात घालून आडवाटेने जाऊन शेतीच्या काठावर असलेल्या नदीपात्रतात उतरतात. हे टाळणे आता गरजेचे झाले आहे.

मोशीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती नको
गतवर्षी मोशी येथील बंधार्‍यानजीक एक कुटूंब गणेशमूर्ती विसर्जनासाठी असेच प्रशासनाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत नदीपात्रात उतरले होते. यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यंदा याबाबत काळजी न घेतल्यास तशीच दुर्घटना घडू शकते. श्रद्धेला मोल नसते; मात्र जीवन अनमोल असते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

SCROLL FOR NEXT