पुणे

चक्क पन्नास लाखांची उधळपट्टी; टँकरमुक्त पाणी पुरविण्यासाठी काढली निविदा

अमृता चौगुले

वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: वडगाव शेरी परिसर आता टँकर मुक्त झाला आहे ; तरी या भागात पाणी पुरविण्यासाठी पन्नास लाखांची निविदा काढण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडगाव शेरीमध्ये भामा आसखेड योजनेचे पाणी आल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर समान पाणीपुरवठा योजनाही राबविली जात आहे.

त्यामुळे पाण्याची टंचाई तुलनेने कमी झाली आहे तरी नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाने पाणीपुरवठा पन्नास लाखांची निविदा नक्की कोणासाठी होती, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये भामा आसखेड पाणीपुरवठा योजनासाठी अनेक टाक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये नवीन पाईप लाईन टाकण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले.

भामा आसखेड प्रकल्प सुरू झाल्यानंतर पाणी टंचाई कमी झाली. वडगाव शेरी गाव टँकरमुक्त झाले. कल्याणीनगर आणि खराडीमधील टँकरची मागणी कमी झाली आहे. अशी परिस्थिती असताना निविदा का प्रसिद्ध केली, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. याबाबत आयुक्तांकडे सामाजिक कार्यकर्ते आरती सोनाग्रा यांनी तक्रार केली आहे.

पालिका टँकरमाफियांसाठी काम करत नाही

येरवडा आणि होळकर ब्रीज येथील टँकर पॉईंट बंद करण्यात आले आहेत. त्यानुसार लोहगाव, विमाननगर, खराडी, वडगाव शेरी, येरवडा परिसर, ताडीवाला रोड या भागात काही तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा बंद असल्यास. वडगाव शेरी पंपिंग स्टेशनवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. जुन्या महापालिकेच्या हद्दीतील पूर्व भागासाठी ही निविदा काढली आहे. पूर्वीपेक्षा टँकर मागणी कमी असली तरी अडचणीच्या वेळी टँकर पाठवावे लागतात. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा काढली आहे. टँकरमाफियांसाठी पालिका काम करत नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांमध्ये नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये समान पाणीपुरवठा आणि भामा आसखेड प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. या प्रकल्पामुळे बर्‍याच प्रमाणात पाणी टंचाईची समस्या मिटली आहे. तरी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपयांची निविदा का काढण्यात आली आहे.

                                                     आरती सोनग्रा, सामाजिक कार्यकर्त्यां

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT