वडगाव मावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली. अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीस्तरावर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचार्यांचे सहभागातून वक्तृत्व, चित्रकला, वेशभूषा, निबंध आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजे यादृष्टीने सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, त्या संदर्भातील बॅनरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, मंडल कार्यालय, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, विविध कार्यकारी सोसायटी आदी कार्यालयांवर ध्वज उभारणी बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून सर्व ग्रामपंचायत स्तरावर अशाच प्रकारचे नियोजन करण्याचे सूचित केले आहे. शाळा पातळीवरील विद्यार्थ्यांच्या सर्व स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी भागवत यांनी दिली.