पुणे

गैरसमजातून तक्रार अन् पोलिसांना ताप!

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा: मंचर (ता. आंबेगाव) येथे भरदिवसा कपाट उचकटून त्यातील दागिने व रोख 2 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद प्रतिभा थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर तत्काळ पोलिस घरी आले. पण, ही तक्रार गैरसमजातून दिल्याने पोलिसांनी डोक्याला हात लावला. मंचर येथील गांजाळेमळा वस्तीतील 'अनुसया प्रेस्टिज' या इमारतीतील 20 क्रमांकाच्या सदनिकेतील प्रतिभा थोरात यांचे पती दशरथ थोरात कामानिमित्त मुंबईला गेले होते. प्रतिभा थोरात या सकाळी घराला कुलूप लावून मुलाला शाळेत सोडवून दुकानात थांबल्या होत्या. संध्याकाळी त्या साडेपाच वाजता शाळेतून मुलाला घेऊन घरी आल्या.

त्या वेळी त्यांना दरवाजाचे कुलूप उघडे दिसले. लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे होते. साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तेथे त्यांना सोन्याचे दागिने व पैसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी मंचर पोलिस ठाण्यात जाऊन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 65 हजार रुपये, असे एकूण 2 लाख 36 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली, अशी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस नाईक संजय नाडेकर व इतर पोलिस घरी आल्याचे पाहून मुलगा देवांश आई प्रतिभा यांना म्हणाला, 'घरात पोलिस कशाला आले?' त्यावर प्रतिभा यांनी 'आपल्या घरात चोरी झाली' असे सांगितले.

त्या वेळी देवांश म्हणाला, 'माझी कपाटात असलेली खेळण्यातील गाडी शोधत होतो. त्या वेळी कपाटातील सामान व कपडे काढून ठेवले. शाळेत जायच्या गडबडीत कुलूप लावले नव्हते,' हे ऐकून प्रतिभा यांना धक्का बसला. अस्ताव्यस्त पडलेल्या कपड्यांमध्ये रक्कम व दागिने मिळाले, असा जबाब प्रतिभा थोरात यांनी मंचर पोलिसांना दिला. मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर व तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी ही माहिती दिली. मात्र, यामुळे पोलिसांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

SCROLL FOR NEXT