पुणे

गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट; कॅश मेमो आणि प्रत्यक्ष पावतीत फरक

अमृता चौगुले

पुणे;  पुढारी वृत्तसेवा: दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच गॅसच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच गॅस वितरकांकडूनही होणार्‍या मानसिक त्रासाला ग्राहकांना बळी पडावे लागत आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर तब्बल चार ते पाच दिवसांनी त्याचे वितरण केले जात असल्याने हडपसर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हडपसर येथील अनेक ठिकाणी समिधा गॅस एजन्सी सिलिंडर वितरणाचे काम करीत आहे. यापूर्वी साडेसतरा नळी येथून गॅस वितरण होते, तेव्हा नियमित व वेळेत सिलिंडर पोहोचविले जात होते.

परंतु अलिकडच्या काळात ग्राहकाने गॅस बुकिंग केल्यानंतर चार ते पाच दिवसांनी गॅस पोहोचविला जातो. त्यातच डिलिव्हरी चॉर्जही 25 रुपये आकारले जातात. त्याशिवाय संबंधित कर्मचारी गॅसच देत नसल्याचा अनेकांना अनुभव येत आहे. संबंधित एजन्सीकडूनसिलिंडरचे ठरलेल्या पैशांव्यतिरिक्त जादा पैसे न देण्याचे आवाहन केले जात असले तरी संबंधित कर्मचारी मात्र डिलिव्हरी चार्ज घेतल्याशिवाय ग्राहकाला सिलिंडरच देत नसल्याच्या तक्रारी हडपसर परिसरातील नागरिकांनी
केल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे शिक्रापूर येथील प्लँटमध्ये पाणी शिरलेले आहे. त्यामुळे गॅस टाक्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे हडपसर परिसरातील माळवाडी, साडेसतरानळी परिसरातील नागरिकांना उशिराने गॅसचे वितरण होत आहे. साडेसतरानळी येथील जादा पैशांबाबत ग्राहकाशी बोलणे झाले असून त्यांना त्यांचे जादा पैसे परत करण्यात आले आहेत.

                                           – कर्मचारी, समिधा गॅस वितरक

साडेसतरा नळी परिसरात अलिकडच्या काळात गॅसचे वितरण उशिरा केले जात आहे. आमच्या घरात गॅसचे दोन कनेक्शन असून त्यातील एका कनेक्शनचे बुकिंग केले होते. त्यानुसार 2 जुलै रोजी 1005 रुपयांचा कॅश मेमोचा मेसेजही आला, परंतु शुक्रवारी सिलिंडर पोहोचवताना वितरकाने 1055 रुपयांची पावती दिली. गॅसच्या दरवाढीचा भुर्दंड वितरकांच्या चुकांमुळे ग्राहकांनी सोसणे चुकीचे आहे. त्यातच बुकिंग केल्यानंतर त्वरित सिलिंडर पोहोचवले जात नसल्याच्या तक्रारीही वाढलेल्या आहेत.

                                                            – अनिल पोपट जगताप, ग्राहक.

SCROLL FOR NEXT