चाकण : पुढारी वृत्तसेवा: सोशल माध्यमांतील खोडसाळ पोस्टमुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील गुरांच्या बाजारावर शनिवारी (दि. 9 ) मोठा परिणाम झाला. अनेक पशुपालक शेतकरी बाजाराकडे फिरकलेच नाहीत. चाकण पोलिसांनी मोठा बंदोबस्त चाकण मार्केटमध्ये ठेवूनही गुरांच्या बाजारात अपेक्षित खरेदी-विक्री झालीच नाही. रविवारी (दि. 10) मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील गुरांच्या बाजारात शनिवारी मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा होती. मात्र, काही संघटनांच्या माध्यमातून शनिवारी (दि. 9) चाकण येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली.
त्यामुळे हा बाजार सुरू राहणार की बंद, याबाबत संभ्राम निर्माण झाला. बाजार समिती प्रशासनाने बाजार सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. चाकण पोलिसांनी या पार्श्वभूमीवर गुरांच्या बाजारात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, अनेक पशुपालक शेतकरी, व्यापारी यांनी गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरवली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले की, बकरी ईदच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 9) होणारा गुरांचा बाजार खूप मोठा होण्याची अपेक्षा होती. मागील आठवड्यात या बाजारात पाच कोटींची उलाढाल झाली होती. मात्र, काहींनी जाणीवपूर्वक शनिवारी गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आल्याची पोस्ट सोशल माध्यमात व्हायरल केली.
त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतील आणि राज्यासह परराज्यांतील बोकड खरेदीदार आणी विक्रेते यांनी गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे पशुपालकांचे नुकसान झाले. बकरी ईदला विक्री न झालेले बोकड पुन्हा वर्षभर सांभाळण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. याशिवाय गायी, बैल, म्हैस यांच्या बाजारावरदेखील परिमाण झाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. शनिवारी चाकण येथील बाजारात विक्रीसाठी आलेल्या 5 हजारपैकी 4 हजार बोकडांची विक्री झाली. त्यास 10 ते 50 हजार रुपये एवढा भाव मिळाला. गुरांच्या बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 50 लाख रुपये झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत गुरांच्या बाजारात पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.