पुणे; पुढारी वृत्तसेवा: गाव म्हटलं की तिथं भावकी आलीच. याच गावच्या भावकीमुळे जिल्ह्यातील 134 गावांनी दोन वर्षांत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील एक रुपयाही खर्च केला नाही. या गावांपैकी बहुतांश गावांमध्ये अंतर्गत वाद आणि इतर कारणांमुळे हे पैसे खर्च झाले नसल्याचे समोर आले आहे. अशा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.
ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी कसा आणि कोणत्या योजनांच्या कामांसाठी खर्च करायाचा, याचे निकष आणि नियमावली ग्रामपंचायतींना देण्यात येते. तरीसुद्धा हा निधी ग्रामपंचायती वेळेत खर्च करीत नाहीत, हा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर तसाच पडून राहतो. हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी नुकतेच जिल्हा परिषदेने सुनावणी घेतली, त्यामध्ये या दोन वर्षांमध्ये एकही रुपया खर्च न करणार्या ग्रामपंचायतींना सक्त सूचना करत, कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदानाच्या स्वरूपात 2020-21 आणि 2021-22 वर्षातील अबंधित व बंधितसाठी प्राप्त निधीमधून ग्रामंपचायतींना एक ते आठ हप्त्यांमध्ये निधीचे वाटप करण्यात आले आहे. 1 हजार 385 ग्रामपंचायतींपैकी 134 ग्रामपंचायतींनी एकही रुपया खर्च केला नाही. पंचायत विभागाकडून घेतलेल्या सुनावणीमध्ये या ग्रामपंचायतींना समाधानकारक उत्तरे देता आलेली नाहीत.
वित्त आयोगाचा वाटप केलेला लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत खात्यावर शिल्लक ठेवण्यात आला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 मधील नियम 4 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींवरील ही मोठी कारवाई आहे. थेट सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्यांवरच कारवाईचे आदेश दिल्याने ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले आहेत. अंतर्गत वादाबरोबरच काही ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांना पुरेशी माहिती नसल्याने देखील असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेने 15व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्याकडे दिलेला विकास निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींची सुनावणी घेण्यात आली. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत निधी खर्च आणि विकासकामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
तालुका ग्रामपंचायत संख्या
आंबेगाव 5
बारामती 15
भोर 25
हवेली 11
इंदापूर 15
जुन्नर 12
खेड 23
मावळ 1
मुळशी 7
पुरंदर 13
शिरूर 5
वेल्हे 2