पुणे

‘खडकवासला’तून 15 टीएमसी विसर्ग

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: शहर व जिल्ह्याची तहान भागवणार्‍या खडकवासला धरण साखळीतील गेल्या महिनाभरात खडकवासला धरणातून तब्बल 15 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले. सर्व धरणे शंभर टक्के भरल्याने जादा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चार धरणांच्या खडकवासला साखळीची पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. त्यापेक्षा पन्नास टक्के अधिक पाणी यंदाच्या हंगामात धरण साखळीत जमा झाले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरण साखळीत जेमतेम 3 टीएमसी पाणी होते.

टेमघर येथे 1 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंत विक्रमी 2847 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव येथेही पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुणे शहर व परिसराला वर्षभर पुरेल इतके 15 टीएमसी जादा पाणी आतापर्यंत खडकवासलातून सोडण्यात आले आहे. यातील 11.08 टीएमसी पाणी सांडव्यातून सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरण व लाभक्षेत्राला झाला, तर मुठा कालव्यातून 4 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याचा लाभ हवेली, दौंड, इंदापूरमधील शेतकर्‍यांना झाला. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, धरणे भरल्याने खडकवासलातून अतिरिक्त पाणी मुठानदी व मुठा कालव्यात सोडण्यात येत आहे.

पुण्याचे वर्षभराचे पाणी नदीपात्रात
शहराला पिण्यासाठी दर महिन्याला 1.3 टीएमसी पाणी लागते. यंदाच्या पावसाळी हंगामात 15 टीएमसी अतिरिक्त पाणी खडकवासलातून सोडण्यात आले. हे पाणी पुणेकरांना वर्षभर पुरले असते.

SCROLL FOR NEXT