पुणे

खडकवासला : नोटीस न देता वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: ग्राहकांना पंधरा दिवस अगोदर लेखी नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचा प्रकार सिंहगड रोड, धायरी परिसरात सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, थकीत वीज बिलाची ग्राहकांना मोबाईलवर रीतसर सूचना दिली जात आहे. त्यानंतर वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरू केली आहे.

त्याचा मोठा फटका धायरी, सिंहगड रोड परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या बेनकर मळा, रायकरनगर, अंबाईदरा भागातील मजुरी, नोकरी करणार्‍या महिला, नागरिकांना बसत आहे. उपसरपंच धनंजय बेनकर म्हणाले, 'नोटीस देऊन थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा नियम आहे. याबाबत स्थानिक अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.' घरात कोणी नसताना मीटर काढून नेले जात आहेत. थकीत वीजबिल भरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नियमानुसार खंडित केला : महावितरण
महावितरणचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता तालेवार म्हणाले, 'वीजबिल थकीत ग्राहकांना मोबाईल फोनवर रीतसर नोटीस दिली जाते. त्यानंतर वीज नियामक कायद्यानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.'

ग्राहकांच्या संख्येत वाढ; मनुष्यबळ 'जैसे थे'च
सिंहगड रोड , धायरी, खडकवासला भागात अलीकडच्या वर्षांत घरगुती वीज ग्राहकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मुख्य गावठाणापासून दूर अंतरापर्यंत सोसायट्या, लोकवस्त्यांचे जाळे पसरले आहे. या भागात जवळपास एक लाखांहून अधिक ग्राहक आहेत. दुसरीकडे वीज वितरणकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज बिल भरण्यापासून नवीन कनेक्शन, खंडित पुरवठा सुरू करणे आदींसाठी ग्राहकांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT