पुणे

खडकवासला : नांदेड सिटीसमोर कचर्‍याचे ढिगारे; डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईचा धोका

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोडवरील प्रचंड वर्दळीच्या नांदेड सिटी गेटजवळील रस्त्यावर कचरा, राडारोड्याचे ढिगारे साठले आहे. पावसामुळे पाणी साठून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह ये-जा करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दुर्गंधी पसरून माश्या, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची तक्रार खडकवासला भाजप ओबीसी आघाडी अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी केली आहे. एका बाजूला अलिशान नांदेड सिटी संकुल व दुसर्‍या बाजूला गेटजवळील मुख्य सिंहगड रस्त्यावर कचर्‍याची दुर्गंधी असे चित्र आहे.

ये-जा करणारे तसेच काही स्थानिक नागरिक, व्यावसायिक रस्त्यावरच शिळे अन्न, सोडलेले मांस, कचरा फेकून गायब होत आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून रस्त्यावर कचर्‍याचे ढीग पडले आहेत. सडलेल्या कचर्‍यासह प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. पाणी साठून एका बाजूच्या रस्त्यावर दलदल पसरली आहे, असे असताना आरोग्य विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. सिंहगड रोड आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक अजय जगधने म्हणाले, 'नांदेड सिटी गेटजवळील रस्त्यावर साठलेला कचरा तातडीने हलविण्यात येणार आहे. रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.'

SCROLL FOR NEXT