पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना व्हायरसवर मात करणारे 'एरोस्कॅन प्लगइन' नावाचे छोटे यंत्र पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कने तयार केले आहे. हे यंत्र प्लगइन मॉस्किटो मशिनप्रमाणेच घरात, कारमध्ये वापरता येऊ शकते. त्यामुळे घर आणि कार सॅनिटाईज करण्याची सोय अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान पार्कच्या संशोधकांनी या अत्याधुनिक यंत्राचे संशोधन केले आहे. कोरोना विषाणू आल्यावर येथील संशोधकांनी एक मोठे यंत्र विकसित केले होते. ते मोठे असल्याने हाताळणे अवघड जात होते. त्यावर मात करीत नवे संशोधन करण्यात आले आहे.
बंदिस्त खोलीत सर्वाधिक विषाणूचा धोका
बंदिस्त खोली, वातानुकूलित दुकाने, क्लिनिक, घरे, मॉल, चित्रपटगृह या ठिकाणच्या बंदिस्त हवेत पॅथोजन्स, अलर्जन्स व इतर प्रकारचे प्रदूषित घटक तयार होतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोकळ्या हवेपेक्षा बंदिस्त हवेत जास्त होतो. त्यासाठी हे यंत्र अतिशय उपयुक्त व क्रांतिकारी ठरले आहे.
आयोनायझेशन तंत्रज्ञानाने तयार केले मशिन
हे मशिन आयोनायझेशन तंत्रज्ञान वापरून अतिशय सोप्या पद्धतीने तयार केले आहे. ते स्विच ऑन करताच बंदिस्त रूम व कारमधील विषाणू नष्ट होतात. या यंत्रातून बाहेर पडणारे निगेटिव्ह आयन्स, घराच्या भिंती, कोपरे, अडगळीच्या जागाही सॅनिटाईज करतात; तसेच घरात कुठे बुरशी तयार होत असेल, तर तीही नष्ट करते. याबरोबर सल्फेट व नायट्रेटचे विविध ऑक्साईडस्देखील या यंत्रामुळे नाहीसे होतात. ज्यामुळे घरातील प्रदूषण नाहीसे होते.