मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: मुंढवा-कोरेगाव पार्क रसील हॉटेल वेस्टिनशेजारी असलेल्या चौकामधील ओढ्यालगतचे होर्डिंग कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. मुख्य रस्त्यालगत असलेले हे होर्डिंग ओढ्याच्या दिशेने पडल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही; अन्यथा होर्डिंगखाली वाहने अडकून मोठी जीवित व वित्तहानी झाली असती.
परिसरातील ओढ्याच्या बाजूला लावलेल्या या होर्डिंगच्या हद्दीवरून कायम वाद होतो. येथील जागेची मालकी ही पालिकेची आहे की कॅन्टोन्मेंटची, हेच अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेनंतर हे दोन्ही विभाग जबाबदारी एकमेकांवर टाकून मोकळे होत आहेत. पालिका व लष्कर प्रशासनामध्ये नसलेल्या ताळमेळाचा फायदा घेत काहींनी या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभे केले आहेत.
होर्डिंग लावलेल्या जागेसंदर्भात पालिकेने कॅन्टोन्मेंटशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याविषयी कॅन्टोन्मेंटकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. कॅन्टोन्मेंटकडे विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले जाते. या वादामध्ये येथे होर्डिंग लावणार्यांना रान मोकळे झाले असून, काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.