पुणे

कोडीतला पावसाअभावी भातरोपांची वाढ खुंटली; कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा प्रयत्न

अमृता चौगुले

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा; पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप मोठा पाऊसच न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी कमी पावसावर भातरोपांसाठी बियाणे टाकले, त्यांच्या रोपांची वाढ खुंटली असून, कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा प्रयत्न होत आहे. पश्चिम खोर्‍यात अनेक ठिकाणी शेतकरी भातशेती करतात. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने ओढे-नाले वाहत नाहीत. भातखाचरांतही पाणी नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आज-उद्या पाऊस पडेल, या आशेवर कृत्रिमरीत्या विहिरीतून व बोरवेलद्वारे पाणी देऊन भातरोपांची निर्मिती केली. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे रोपांच्या वाढीवर उष्ण हवामानाचा परिणाम होत आहे.

भातांची रोपे पिवळी पडून सुकू लागली आहेत. दर वर्षी 60 रुपये किलोचे काळीकुसळ, इंडम किंवा इंद्रायणी बियाणे विकत घेऊन भातरोपे तयार करतो. मात्र, या वर्षी 160 रुपयांचे बासमती बियाणे विकत आणून भातरोपे तयार करण्यासाठी प्रथम प्रयत्न केला आहे. मात्र, पाऊस लांबला, अनुकूल हवामान नाही व कडक उन्हाचा परिणाम भातरोपांवर होत आहे. परिणामी, भातरोपांची वाढ खुंटली आहे. रोपे पिवळी पडल्याने बासमती भात उत्पादन प्रयोग यशस्वी होईल का नाही, याविषयी शंका असल्याचे धरणवस्ती येथील शेतकरी सुखदेव बडदे व बापू मुकादम यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT