पुणे

कोट्यवधी खर्चूनही पानशेत रस्त्याची चाळण

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुणे-पानशेत रस्त्याची खड्डे पडून ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. किरकटवाडी फाट्यावरील मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर साठून डबकी तयार झाली आहेत. नांदेड फाटा, खडकवासला, डोणजे, गोर्‍हे बुद्रुक आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. सर्वांत बिकट स्थिती खडकवासला गावातून जाणार्‍या रस्त्याची झाली आहे.

धरणमाथ्यावर खड्ड्यातून ये-जा करताना वाहने कोसळून अपघात होत आहेत. चारच दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने धरणमाथ्यासह ठिकठिकाणचे खड्डे डांबर खडी टाकून बुजवले होते. मात्र, पावसामुळे रस्त्यावर पाणी साठून पुन्हा खड्डे पडले आहेत. गोर्‍हे बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर धो धो पाणी वाहत आहे. चिखल, राडारोडा पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून पर्यटक जखमी झाले आहेत. खडकवासला बाह्यवळण रस्त्यावर मराठी शाळेपासून वळणापर्यंत पाण्याची डबकी साठून दुर्दशा झाली आहे. धायरी येथील डीएसके रोड, दळवीवाडी रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून तळी साठली आहेत.

SCROLL FOR NEXT