केसनंद; पुढारी वृत्तसेवा: केसनंद (ता. हवेली) येथील मानेवस्तीत गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक व विक्री करणार्या वाघोलीतील गुटखा विक्रेत्यावर गुन्हे शाखा युनिट 6 व अन्न, औषध (एफडीए) प्रशासनाने एकत्रित कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 46 पोत्यांतील 16 लाख 46 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. संदीप भिकचंद चोरडीया (रा. वाघोली), गोपाल ज्ञानदेव शेंडे, विशाल दिनेश सोळंकी (दोघेही रा. वाडेगाव रोड, केसनंद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व भेसळ सुरक्षा निरीक्षक बालाजी औदुंबर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
मानेवस्ती परिसरात बाळासाहेब माने यांच्या खोलीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनास कळविले. एफडीए अन्न निरीक्षक बालाजी शिंदे यांनी पोलिसांसह मिळून गुटख्याचा पंचनामा केला. पंचनाम्यावेळी 16 लाख 46 हजार रुपये किमतीची गुटख्याची 46 पोती आढळली. पोलिसांनी गुटखा जप्त करून खोलीही सील केली आहे. गुटखा जप्त केलेली खोली सीलबंद करून खोली मालक बाळासाहेब माने यांनी विना भाडे करार व पोलिस पडताळणीशिवाय गुटखा विक्रेत्यास भाड्याने दिली असल्याचे तपासणीत आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. युनिट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने तपासणी केली आहे.