पुणे

कुसगाव बोगदा डिसेंबरपासून खुला; पुणे- मुंबई वाहतुकीचा वेळ होणार कमी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कुसगावमध्ये असलेला 'मिसिंग लिंक' वाहतुकीसाठी डिसेंबर (2024) पासून खुला करण्यात येणार आहे. सध्या या मिसिंग लिंकचे काम सुमारे 85 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे पुणे आणि मुंबई या शहराचे अंतर तेरा किलोमीटरने कमी होणार आहे. दरम्यान, याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या आणि आशिया खंडातील सर्वाधिक उंच केबल ब्रिजचे कामही जोरात सुरू आहे. पुढील चार महिन्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे.

मात्र, त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर 'एमएसआरडीसी'ने अपघात रोखण्यासाठी तसेच प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी खोपोली कुसगावदरम्यान नवीन मार्गिका (मिसिंग लिंक) बांधण्याचा निर्णय घेतला. या 13.3 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) कामाला फेब्रुवारी 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली. 'मिसिंग लिंक प्रकल्प' हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर 180 मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आणि सर्वांत जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होणार आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने कसा असेल प्रकल्प?

  • लोणावळ्यामध्ये द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात.
  • आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते.
    या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे
  • मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.
  • या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम 'एमएसआरडीसी'ने सुरू केले.

ही कामे होणार

  • बोरघाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार
  • खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठपदरी रस्ता होणार.
  • प्रकल्पांतर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठपदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरू.
  • बोगद्याची रुंदी 23.5 मीटर.
  • मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा.
  • पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर बोगदा.
  • दोन्ही बोगद्याचे खोदकाम पूर्ण.
  • केबल ब्रिजची लांबी 645 मीटर आणि उंची 135 मीटर.
  • आशिया खंडातील सर्वांत मोठा दरीवरील पूल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT