वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीनंतर सुरू असलेल्या पावसामुळे वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा, पानशेत आदी भागातील रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. कादवे, कुसगाव खिंड आदी ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गुंजवणी, पानशेत धरण भागासह तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. करंजावणे ते शिवापूर रस्त्यावर निगडे बुद्रुक, वांगणी आदी ठिकाणी पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कुसगाव खिंडीत पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका आहे.
वेल्हे, राजगड, तोरणा, पानशेत भागात सलग आठ दिवस अतिवृष्टीचे थैमान सुरू होते. त्यानंतर डोंगरी पट्ट्यात संततधार सुरू आहे. पासली-केळद रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कुसगाव खिंड तसेच इतर ठिकाणी उन्मळून आलेल्या दरडी हटविण्यात याव्यात, तसेच खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी तानाजी मांगडे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पासली-बालवड, पानशेत, कादवे आदी रस्त्यांच्या दरडी, पुलाच्या सफाईचे काम सुरू केले आहे, असे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ यांनी सांगितले.