बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पिंपळवंडी शिवारात, कुकडी डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ढासळल्याने मोठया प्रमाणात पाणीगळती होण्याची शक्यता आहे. या कालव्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणातून पाणी आवर्तन सुरू होण्यापूर्वीच पिंपळवंडी बसस्थानक शिवारात कुकडी डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ढासळले आहे. कालव्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त होत आहे. कालव्याचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी झाले आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
कुकडी डाव्या कालव्याचे ढासळलेले अस्तरीकरण हे पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या पुलालगत असल्याने, महामार्गावरून धावणार्या हजारो वाहनांच्या वर्दळीचा पुलालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. सध्या कालव्यातून आवर्तन सुरू नसल्याने या कालव्याचे अस्तरीकरण दुरुस्ती करताना जलसंपदा विभागाला अडथळा येणार नाही. त्याचबरोबर आवर्तन सुरू झाल्यानंतर वाया जाणारे पाणीदेखील वाचणार आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी होत आहे.