कामशेत : नाणे- उकसान रस्त्यावर नाणे पुलाजवळ भराव खचल्याने डंपर उलटला. नाणे येथे पुराचे पाणी साचत असल्याने दरवर्षी वाहतूक दोन-तीन दिवस ठप्प होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्यावर भराव टाकून रस्त्याची उंची वाढवली; परंतु योग्य पध्दतीने काम न झाल्याने या ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात; तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होत; मात्र काम अजूनही अपूर्ण असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नुकत्याच केलेल्या रस्त्याच्या भरावाने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अवजड मालवाहतूक करणारा डंपर या ठिकाणी उलटून अपघात झाला. नागरिकांनी रस्त्याच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ते पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.