रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या पावसाने शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे पिके मातीमोल झाली आहे. एका बाजूने पाऊस काही थांबताना दिसत नाही तर दुसर्या बाजूला वातावरणीय बदलामुळे शेतातील तरकारी पिके, जनावरांचा हिरवा चारा, साठवणूक केलेला कांदा या पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. कान्हूर मेसाई ( ता. शिरूर) येथील शेतकर्यांनी साठवून ठेवलेला कांदा फेकून देण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. यामुळे जवळपास शेतकर्याचे 3 लाख ते 5 लाखांपर्यंत ( चालू बाजारभाव) नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.
यंदाच्या वर्षात शेतकर्यांचा नैसर्गिक संकटाशी सामना सुरू आहे. पावसाने लागवड केलेली पिके काढू दिली नाहीत आणि साठवणूक केलेली विक्री करू दिली नाही. सध्या कांद्याचे दर जेमतेम आहेत, अशातच कान्हूर मेसाई येथील कांदा उत्पादक करणारे शेतकरी सुदाम तळोले यांचा कांदा चाळीत साठवणूक केलेला 500 पिशवी ( प्रत्येकी 50 किलो ) कांदा अक्षरश: सडून गेला आहे. त्यामुळे या शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने लवकर पंचनामा करून आम्हाला मदत मिळावी, अशी भावना कांदा उत्पादक शेतकरी सुदाम तळोले यांनी व्यक्त केली आहे.