पुणे

कसबा पेठ : नदीपात्रात घुमतोय आव्वाज! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांचा कसून सराव

अमृता चौगुले

नितीन पवार

कसबा पेठ : कोरोना संसर्गानंतर दोन वर्षांनी पुण्यात उत्सवांवरील निर्बंध उठवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा शनिवार पेठेतील मुठा नदीपात्रातील आवारात सध्या जोरदार सराव सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नदीपात्र परिसर ढोल-ताशांच्या आवाजाने दुमदुमून जात आहे. पथकांचा सराव बघणार्‍यांच्या गर्दीतही
वाढ झाल्याचे ढोल-ताशा पथकांच्या वरिष्ठांच्या वतीने सांगण्यात आले.

यंदा पथकांच्या संख्येसोबतच नवीन वादकांचीही संख्या वाढली आहे. यामुळे पथकात प्रवेश द्यायचा तरी कोणाला हा प्रश्न प्रत्येक ढोल-ताशा पथकांच्या वरिष्ठांना पडत आहे. नव्या वादकांना जास्त सरावाची गरज असते. जुन्या वादकांच्या वादनांत दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे त्यांचादेखील जास्त सराव घेण्यावर पथकांकडून भर दिला जात आहे. नव्या वादकांना शिकवण्यासोबत जुन्या वादकांसोबत ताळमेळ बसण्यासाठी रोज जोरदार सराव सुरू असल्याचे ढोल-ताशा पथकांच्या प्रमुखांनी सांगितले.

या पथकांचा सहभाग
आदिमाया ढोल-ताशा पथक, स्वराज्य ढाल-ताशा पथक, नूमवी वाद्यपथक, समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा व ढाल-तलवार पथक, धर्मयोद्धा प्रतिष्ठान, रुद्रांग वाद्यपथक, शिवांश पथक, शंभो ढोल-ताशा पथक, युवा वाद्य पथक, आरंभ ढोल-ताशा पथक, नादवरदहस्त ढोल-ताशा पथक आदींसह सुमारे पंधरा पथकांचा सराव दररोज संध्याकाळी मुठा नदीपात्राच्या आवारात सुरू असतो.

पथकाचे यंदा पंधरावे वर्ष असून, 100 ढोल, 20 ताशांसह 200 मुले, 200 मुलींचा दररोज सराव सुरू आहे. शनिवार, रविवारी आम्ही जास्त सराव करतो. मर्दानी खेळ यावर्षींपासून सुरू करण्यात येणार आहेत. ढोल-ताशा वादकांचा सराव बघण्यासाठी सध्या नदीपात्रात गर्दी होत आहे.
             – अविनाश बकाल, संस्थापक-अध्यक्ष, आदिमाया ढोल-ताशा पथक.

पथकात एकूण सहा गट असून 10 जणांचा ग्रुप केला जातो. प्रत्येक गटात पाच जुने व पाच नवीन वादक असतात. यात ढोल बांधण्यासह प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गटप्रमुखांवर असते. 30 ढोल, 15 ताशा, ध्वज, टाळ या वादकांबरोबर आमचा सध्या सराव सुरू आहे. यंदा मोठ्या संख्येने नवीन वादक पथकांत सहभागी होत आहेत.

                                        – सागर गायकवाड, स्वराज्य ढोल-ताशा पथक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT