पुणे

कळंबच्या किरण मगरसाठी 31 लाखांची बोली, यू मुंबा संघातून खेळणार ‘प्रो कबड्डी’

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कळंब येथील किरण लक्ष्मण मगर या तरुणाची प्रो-कबड्डी च्या पर्व -9 साठी यू मुंबा संघामध्ये निवड झाली आहे. किरण याच्यासाठी यू मुंबा संघाने 31 लाखांची बोली लावली होती. किरण याला लहानपणापासूनच कबड्डीची आवड आहे, त्याने आजवर बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य व देशपातळीवरील कबड्डी स्पर्धेमध्ये यशस्वी खेळी केली आहे.

त्याने 19 वर्षांखालील व खुल्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले असून, कळंबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या 9 व्या पर्वातील सामन्याच्या लिलाव प्रक्रियेत यू मुंबा संघाने किरणसाठी 31 लाखांची बोली लावून आपल्या संघामध्ये त्याचे स्थान निश्चित केले आहे. किरण यांच्या या यशाने कळंब पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा आनंद झाला आहे. किरणच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याची आई राधा या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. वडील 20 वर्षांपासून बेपत्ता आहेत.

भाऊ विशाल मगर पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले ध्येय गाठणार्‍या किरण याने भावी पिढीला आदर्श घालून दिल्याने गावकर्‍यांनी फटाके वाजवून त्यांचे जंगी स्वागत करत गावामधून मिरवणूक काढली आहे.

SCROLL FOR NEXT