पुणे; पुढारी वृत्तसेवा: कर्वे समाजसेवा संस्थेची सीमाभिंत कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीमाभिंत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.
पावसाच्या पाण्यामुळे भिंत खचून ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कर्वे समाजसेवा संस्थेसमोर असणारा श्रमिक वसाहत परिसर हा मुळातच दाट लोकवस्ती असणारा परिसर आहे. याच भागात मिलेनियम स्कूल, मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने हा परिसर प्रचंड रहदारीचा आहे. अरुंद रस्ता असल्याने स्थानिकांना अवैध पार्किंग, मोठमोठ्या वाहनांची वर्दळ आदी बाबींचा त्रास सहन करावा लागत आहे.
कर्वे समाजसेवा संस्थेची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही संस्थेने सर्व सीमाभिंतीची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण श्रमिक वसाहतीसारख्या दाट लोकवस्ती असणार्या परिसराला लागूनच ही दगडी सीमाभिंत आहे. चुकून जर अशी घटना पुन्हा घडली, तर यात नागरिकांचे प्राणही जाऊ शकतात.
– सचिन फोलाने, उपाध्यक्ष -भाजपा युवा मोर्चा पुणे शहर