पुणे

कर्नाटकी रताळ्यांची आवक निम्मी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कर्नाटकातील स्थानिक बाजारपेठांमध्ये रताळ्यांना चांगला दर मिळत असल्याने कर्नाटकातील शेतकर्‍यांनी पुण्याच्या बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, कर्नाटकातील रताळ्यांची आवक निम्म्यावर आली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गावरान रताळी दाखल होत आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. रविवारी (दि. 10) आषाढी एकादशी आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगावसह इतर काही गावांतून मार्केट यार्डातील तरकारी विभागात आवक होत आहे. गेल्या वर्षी गावरान रताळ्यांची तीन ते साडेतीन हजार पोती आवक झाली होती. यामध्ये वाढ होऊन ती यंदा 5 हजार पोती झाली आहे. कर्नाटकातून पंधराशे ते दोन हजार पोती रताळ्यांची आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मीच आहे. सध्या घाऊक बाजारात किलोला 35 ते 40 रुपये दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा रुपये अधिक दर मिळत आहे.

स्थानिक भागातील रताळी आकाराने लहान व चवीला गोड असतात, तर कर्नाटक रताळी आकाराने मोठी व तुरट असतात. यामध्ये पुणेकरांकडून स्थानिक रताळ्यांना मोठी मागणी राहते. नवरात्रोत्सवासह आषाढी एकादशी, गोकुळ अष्टमी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी या दिवशी बहुतांश लोक उपवास करत असतात. त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळ्याला जास्त मागणी असते.

                                                             – अमोल घुले, अडतदार, मार्केट यार्ड.

SCROLL FOR NEXT