कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्या. मुजीब शेख यांनी सक्तमजुरीसह कैदेची शिक्षा सुनावली आहे. फिरोज चाँद मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव (सर्व रा.दुरगाव, ता.कर्जत) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
तालुक्यातील दूरगाव येथील अल्पवयीन मुलीला या तिघांनी दि. 1 जून 2021 रोजी पळवून नेले होते. तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेवून पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी फिरोज मुलाणी याला मुलगी पळवून नेण्यासाठी ओंकार कुलथे व अतुल आढाव यांनी टेम्पो उपलब्ध करून मदत केली होती.
याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्य आरोपी फिरोज मुलाणी याच्यावर पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाने मुख्य आरोपी फिरोज मुलाणी याला कलम 376 (2) (एन) अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, तसेच कलम 363अन्वये 3 वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर, त्याला मदत करणारे आरोपी ओंकार कुलथे व अतुल आढाव यांना 3 वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. पुष्पा कापसे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सुमित पाटील यांनी सहाय्य केले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. कोर्ट भैरवी अधिकारी आशा खामकर, नाना दरेकर यांनी काम पाहिले.