पुणे

कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त; धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील चित्र

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या सिंहगड रस्ता, तसेच धायरी परिसरात कचर्‍यांची समस्या गंभीर बनली आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर कचरा फेकून गायब होणार्‍या बेशिस्त नागरिकांमुळे प्रशासन हतबल झाले आहे. धायरी फाट्यावरील सणस विद्यालय, गणेशनगरपासून बेनकर वस्ती, धायरी-नर्‍हे रस्ता, डीएसके रस्ता, नांदेड फाटा आदी ठिकाणी सध्या कचर्‍याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. मुख्य धायरी रस्ता कचरा गोळा करून चकाचक केला जात आहे.

मात्र, आसपासच्या भागांत कचरा वेळेवर उचलला जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पावसामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला राडारोडा व कचरा रस्त्यावर व गटारात साठला आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट परिसरात रस्त्यावर कचरा, राडारोडा पडला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. पाणी साठल्याने रस्त्यावर खड्डे पडले असून, डांबरीकरण वाहून गेले आहे. खड्डेमय रस्ते आणि कचर्‍याच्या समस्यांनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

परिसरातील कचरा रविवारच्या सुटीमुळे गोळा केला नाही. तो लवकरच उचलला जाईल. बेनकरमळा, डीएसके रस्ता, सिंहगड रस्ता आणि नांदेड फाटा परिसरातील रस्त्यांवर नागरिक कचरा फेकून गायब होत आहेत. यामुळे बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

                                                         -अजय जगधने, पर्यवेक्षक, आरोग्य विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT