पुणे : पुढारी वृत्तसेवा : कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी बालभारतीच्या गेटवर जवळपास 200 ते 250 कंत्राटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. बालभारती येथे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून काम करणार्या कंत्राटी कामगारांना जूनच्या अखेरीस त्यांचे कंत्राट संपल्यानंतर कामावर बोलावले गेले नाही.
तसेच त्यांचा जून महिन्याचा पगारही देण्यात आलेला नाही. त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. सेनापती बापट रोडवरील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीचे कार्यालय आहे. येथे हाउसकीपिंगपासून क्लर्क, सेवक, डीटीपी ऑपरेटर, लघुलेखक ते इंजिनिअर असे जवळपास 200 ते 250, तर राज्यात साडेचारशे कर्मचारी काम करतात. हे सर्व कंत्राटी तत्वावर आहेत. त्यांच्या कामाचे ठिकाण हे बालभारतीमधील अकाउंट, वितरण अशा विविध विभागांमध्ये आहे.
संबंधित कर्मचारी रोजंदारी तत्वावर असून कायमस्वरूपी तत्त्वावर नाहीत. त्यांच्याबाबतचा निर्णय हा व्यवस्थापनासोबत बोलून घेण्यात आला आहे. काही कर्मचार्यांची कामाबाबतची पात्रता व इतर बाबींमुळे नवीन लोक भरती करणार आहोत. कामावर कोणाला ठेवायचे, हा कंत्राटदाराचा प्रश्न आहे.
– कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती
बालभारतीमध्ये काम करणारे राज्यात 450 लोक आहेत. आंदोलन करणार असल्याबाबत आम्ही बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांना निवेदन दिले होते. कंत्राटदार बदलला तरी माणसे बदलू नका, असे त्यांना सांगण्यात आले आहे. याआधीही कंत्राटदार बदलले पण माणसे तीच ठेवली होती. मग आता का बदलत आहेत, हा प्रश्न आहे. जर त्यांनी या लोकांना पुन्हा कामावर घेतले नाही तर आंदोलन करण्यात येईल.
– चंद्रकांत धुमाळ, प्रदेश अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ