पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याने येत्या महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील, असा दावा करीत सध्या संपूर्ण देशभर महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून नवीन मुद्दे निर्माण केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त निगडी येथे झालेल्या परिषदेला माजी महापौर योगेश बहल, महिला शहाध्यक्षा कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, पंकज भालेकर आदी उपस्थित होते. गव्हाणे म्हणाले की, इंधन व गॅस सिलिंडरमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावेत.
वर्धापनदिनानिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील पक्ष कार्यालयात सकाळी झेंडावंदन करण्यात आले. पक्ष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आज करण्यात आली. ते अभियान 23 जूनपर्यंत चालणार आहे. शहरातील 46 प्रभागांमध्ये प्रत्येक घरावर झेंडा व स्टिकर लावण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, पर्यावरण विषयकजागृती, नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, महिला आघाडीच्या माध्यमातून महिला बचत गट योजना व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षित बेरोजगार अभियान, डांगे चौक येथे महागाई विरोधात आंदोलन, तीनही विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिर, 46 प्रभागांमध्ये नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तीनही विधानसभा मतदारसंघात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.