पुणे

ओतूरला कांदा प्रश्नासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर; नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको

अमृता चौगुले

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुका शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. 25) ओतूर येथे कांद्याच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. या वेळी शेतकर्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, शेतकरी नेते तानाजी बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले, जुन्नरचे माजी सभापती विशाल तांबे, जुन्नर बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप डुंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आंबादास हांडे आदींसह शेकडो कांदा उत्पादक उपस्थित होते.
प्रमोद पानसरे म्हणाले, पूर्वी भारतीय कांद्याची निर्यात 40 टक्के होती, परंतु केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे कांदा निर्यात 8 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

लक्ष्मण शिंदे यांनी केंद्र सरकारसह राज्य शासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. डॉ. खोमणे यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका कांदा उत्पादक व इतरही शेतकर्यांना बसत असून कांद्याला 30 रु. हमीभाव द्यावा, अशी मागणी केली. दिलीप डुंबरे यांनी, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतीव्यवसाय कर्जाच्या खाईत लोटला जात आहे, अशी खंत व्यक्त केली. तानाजी तांबे यांनी शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करून शासनाने शेतकर्यांकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. कांदा चाळीत सडलेल्या कांद्याचा शासनाने पंचनामा करावा आणि कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मान्यवरांनी केंद्र तसेच राज्य शासनावर जोरदार टीका केली. कांद्याला प्रति किलो सरासरी 30 रूपये इतके अनुदान जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली. शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा समन्वयक आंबादास हांडे यांनी दोन्ही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. प्रशासनाच्यावतीने जुन्नरचे नायब तहसीलदार किरवे यांनी निवेदन स्विकारले. कांदा उत्पादक शेतकर्यांनी सुमारे अर्धा तास अहमदनगर- कल्याण राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT