पुणे; पुढारी वृत्तसेवा: तुम्ही ऑनलाइन औषध मागवताय?… मग थोडं थांबा! कारण ऑनलाइन मागवलेल्या औषधांपेक्षा प्रत्यक्षात वेगळीच औषधे मिळाल्याच्या काही तक्रारी औषध विक्रेत्यांकडे नोंदवल्या गेल्या आहेत. सध्या ऑनलाइन वेब पोर्टल किंवा अॅपद्वारे औषध खरेदी-विक्री करताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडे केल्या जात आहेत. पुणे शहरातील व उपनगरातील बर्याचशा रुग्णांच्या नातेवाइकांकडून ऑनलाइन औषधांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑनलाइन मागवलेल्या औषधांच्या संदर्भात वारंवार चुकीची औषधे आली आहेत, अशी तक्रार जवळच्या फार्मासिस्ट किंवा केमिस्टकडे केली जात आहे.
ऑनलाइन मागवलेल्या औषधांपेक्षा प्रत्यक्षात वेगळी औषधे मिळाल्यामुळे ती जवळच्या औषध दुकानात बदलून देण्याचा आग्रह काही ग्राहक धरीत आहेत. मात्र, असा बदल करून देता येणार नाही, असे आवाहन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे करण्यात आले आहे. औषधांचा 'सोर्स ऑफ ओरिजिन' माहिती नसल्याने अशी औषधे पुनर्विक्रीसाठी माघारी घेणे कायद्याचे उल्लंघन करणारे ठरते, असे संघटनेचे म्हणणे आहे.
ऑनलाइन औषधे नोंदणीकृत फार्मासिस्टकडून आली आहेत की नाही, याची शाश्वती ऑनलाइन फार्मसी देत नाही. ऑनलाइन फार्मसींची सरकारकडे कोणतीही नोंदणी नाही. ग्राहकांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या सभासदांकडून औषधांच्या किमतीवर काही प्रमाणात सवलत दिली जाते. मात्र, ऑनलाइन मागवलेली औषधे बदलून देणे औषधविक्रेत्यांना शक्य नाही, असे असोसिएशनतर्फे नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक अध्यक्ष सुशील शहा आणि सचिव अनिल बेलकर यांनी प्रसिध्द केले आहे.
औषधे खरेदी करताना काय काळजी घ्याल?
औषधांच्या खरेदीत गुणवत्तेबाबत तडजोड नको
सवलतींच्या प्रलोभनांना
बळी पडून आरोग्याशी
खेळू नका
फार्मासिस्ट असलेल्या स्टोअर्समधूनच औषधे खरेदी करा
मान्यताप्राप्त फार्मसीलाच प्रिस्क्रिप्शन पाठवा
औषधे घरपोच करण्याची विनंती करा