पुणे : राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पुण्यात एसटीचे विभागीय कार्यालय येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी बसला हिरवा झेंडा दाखवला. 
पुणे

एसटी महामंडळासाठी 3 हजार ई-बसची खरेदी करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'राज्यातील पहिली इलेक्ट्रिक एसटी सुरू होतेय, हा क्षण ऐतिहासिक आहे. अशाच प्रकारच्या 3 हजार इलेक्ट्रिक बस एसटी महामंडळासाठी खरेदी करण्यात येणार आहेत,' अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पहिल्या टप्प्यात एक ते दोन महिन्यांत 150 ई-बस ताफ्यात दाखल होतील.

काही दिवसांनी एसटीची सर्व सेवा राज्यभर प्रदूषणविरहित असेल, असेही त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या पुण्यातील शंकरशेठ रोड येथील विभागीय कार्यालयात राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक ई- एसटीचा (शिवाई) लोकार्पण सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये, तर नगरमध्ये राज्यात 1 जून 1948 साली सुरू झालेल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन झाले.

याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुण्यातील कार्यक्रमात परिवहनमंत्री अनिल परब, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, एसटीचे पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रास्ताविक केले.

एसटीचा इंधनावरील खर्च वाढला

चालू वर्षांत एसटीला 3 हजार 400 कोटी इंधनावर खर्च आला. यावेळी शासनाने 2 हजार 600 कोटींची एसटी महामंडळाला मदत केली. एसटीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी कायमचा उपाय शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. नव्या सुविधा देऊन महसूल वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

या चालक-वाहकांनी पहिली ई-एसटी नेली नगरला

एसटी महामंडळाचे चालक नितीन सावंत आणि वाहक रिझवान इनामदार यांनी शंकरशेठ रोड येथील विभागीय कार्यालयातून पहिली इलेक्ट्रिक बस नगरला नेली. यामध्ये नगरला जाणारे 43 प्रवासी होते. उद्यापासून ही ई-बस नगरला सकाळी 7 वाजता, 11 वाजता, दुपारी 3 वाजता, सायंकाळी 7 वाजता वाकडेवाडी स्थानकातून सुटेल. या बसचे तिकीट 270 रुपये असणार आहे.

ऐतिहासिक वडाच्या झाडाखाली कोनशिला

शंकरशेठ रोड येथील एसटीच्या कार्यालयातील वडाच्या झाडाखालून 1 जून 1948 रोजी राज्यातील पहिली एसटी बस पुणे-नगर या मार्गावर सुरू केली आणि आता येथूनच राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस त्याच मार्गावर गेली. त्यामुळे एसटी महामंडळाकडून येथे स्मरण म्हणून कोनशिला उभारली. या कोनशिलेचेही उद्घाटन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT